ठाणे महापालिकेच्या टार्गेटवर पुन्हा डान्सबार

ठाणे ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा आपला मोर्चा शहरातील अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्सबारकडे वळवला असून गुरुवारी उपवन येथील सुरसंगीत हा डान्सबार सील करण्यात आला आहे. या डान्सबारच्या तळघराचा वापर अनधिकृतपणे सुरु असल्याच्या तक्रारी अतिक्रमण विभागाचे सह्हायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार पालिकेची अतिक्रमण पथकाने तात्काळ या ठिकाणी कारवाई करून हा बार सील केला आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शहर संपूर्ण अनलॉक झाले आहे. याचा फायदा घेत शहरात काही डान्सबार अनधिकृतपणे सुरु असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वर्तकनगर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या उपवन परिसरात यापूर्वी अनेक डान्सबार सुरु होते. यामध्ये जुलै २०२१ रोजी शहरातील १५ बार सील करण्याची कारवाई देखील पालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती. तर तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात देखील शहरातील डान्सबारवर कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर मात्र बराच काळ अशाप्रकारची कारवाई झालेली नव्हती. डॉ. विपीन शर्मा यांनी आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर ही डान्सबारवरील ही पहिली कारवाई आहे. उपवन परिसरात सुरसंगीत या डान्सबारमध्ये तळघराचा अवैध रित्या वापर सुरु होता. सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी यासंदर्भात तात्काळ माहिती घेऊन या डान्सबारवर कारवाई केली असून या कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गोदापुरे आणि वर्तकनगर समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे उपस्थित होते. यापुढे अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी स्पष्ट केले आहे.