बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाकडून दावे
ठाणे : दिव्यातील डम्पिंग बंद करण्यात आल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जल्लोष करीत आमच्यामुळेच डम्पिंग बंद झाल्याचा दावा केला आहे तर आमच्या पाठपुराव्यामुळेच डम्पिंग हटले असा दावा करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे डम्पिंग हटले असले तरी दिव्यात श्रेयवाद चांगलाच धुमसत आहे
दिवा भागात मागील २२ वर्षे कचरा टाकला जात होता. त्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. एकूणच येथील डम्पिंग बंद व्हावे यासाठी विविध पक्षांनी वांरवार या भागात आंदोलने देखील केली, उपोषणे केली. प्रत्येक निवडणुकीला दिवा डम्पिंग बंद करण्याचे गाजर देखील दाखविले गेले. मात्र डम्पिंग काही केल्या बंद होत नव्हते. परंतु 22 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिवेकरांनी 31 जानेवारीपासून मोकळा श्वास घेण्यास सुरवात केली आहे.
दिवा डम्पिंग कायमचे बंद करण्यात आले. महापालिकेने देखील तसे स्पष्ट केले. परंतु आता दिव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, दिवा डम्पिंग बंद झाले अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. ज्या दिवशी डम्पींग बंद करण्यात आले, त्याच दिवशी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. पेढे देखील वाटून आंनद साजरा करण्यात आला.
दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी वारंराव महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच महापालिकेने देखील ३० जानेवारी रोजी डम्पिंग बंद केले जाईल, असे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांमुळेच डम्पिंग बंद झाले, असा दाव भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला. श्रेय कोणाचे आहे, हे जनतेला माहित आहे, त्यामुळे जे श्रेय घेत आहेत, त्यांना त्यांची पाठ थोपटवून घेऊ द्या, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी व्यक्त केली.
एकीकडे राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर आजही खटके उडत असल्याचेच या निमित्ताने दिसून आले आहे.