कल्याण : निर्माणधीन असलेल्या इमारतीच्या बांधकाम साहित्याच्या दबावामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून अनेक दुचाकी आणि काही चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली परिसरात हा प्रकार घडला आहे.
कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली परिसरात योगेश्वर टॉवर नावाची सोसायटी आहे. या सोसायटीला लागूनच गेल्या काही महिन्यांपासून नव्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी सतत रेती, खडी आदी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात उतरवले जात आहे. मात्र त्याच्याकडून अद्याप याठिकाणी कोणतीही भिंत बांधण्यात आली नसल्याने हे बांधकाम साहित्य शेजारील योगेश्वर टॉवरच्या संरक्षक भिंतीला लागून टाकले जात असल्याची माहिती सोसायटीकडून देण्यात आली.
या बांधकाम साहित्यामुळे संरक्षक भिंतीवर मोठा दबाव देऊन भिंतीला धोका निर्माण होऊन एखादी दुर्घटना घडू शकते, अशी भिती सोसायटीने व्यक्त करत त्यासंदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे आजच्या या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले. या बांधकाम व्यावसायिकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.