अंबरनाथ : अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा आणि भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी, नेत्या पूर्णिमा कबरे यांचे अल्प आजाराने अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात पती सुधीर कबरे आणि भाजयुमोच्या प्रदेश पदाधिकारी पायल कबरे असा परिवार आहे.
पूर्णिमा कबरे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईला केईएम इस्पितळात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज मंगळवार 24 जून रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. संघ परिवाराशी प्रथमपासून निगडित असलेल्या पूर्णिमा कबरे यांची अभाविप तसेच भाजपच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होती. भाजपा संघटना वाढीसाठी त्या कायम प्रयत्नशील होत्या. राम मंदिराच्या निर्मितीसाठी झालेल्या कारसेवेत त्यांनी सहभाग घेतला होता.
अंबरनाथ नगरपालिकेच्या 1995 साली झालेल्या शिवसेना-भाजपा युतीमध्ये त्या वडवली भागातून पालिकेमध्ये निवडून गेल्या होत्या. निवडणुकीत 1998 ते 1999 या एक वर्षाच्या कालावधीत त्यांना नगराध्यक्षा होण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य दिले. नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आणि उप मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत अंबरनाथला अधिवेशन आयोजित केले होते. राज्यातील नगराध्यक्षांना एकत्रित आमंत्रित केले होते. त्यावेळी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल एक वर्षावरून तीन वर्षे करण्याचा शासन निर्णय परिषदेत करण्यात आला होता.
अंबरनाथमधील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पश्चिम भागाप्रमाणे पूर्वेकडे पोलीस स्थानक निर्मितीसाठी देखील पूर्णिमा कबरे यांच्या प्रयत्नाला यश आले आणि शिवाजीनगर पोलीस स्थानकाची निर्मिती झाली. त्यांच्या अंत्ययात्रेला आमदार संजय केळकर, आमदार डॉ .बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. लोकनगरी परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत पूर्णिमा कबरे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.