राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी

मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : राज्यात आता दहहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.

“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्य सचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण कोरोनाच्या छायेत अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी नवरात्र कुठल्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीवर यावर्षी कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच  दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत गोविंदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.

प्रताप सरनाईक यांनी केली होती मागणी

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाप्रताप सरनाईकांनी निवेदन पाठवले होते. यामध्ये आमदार या नात्याने गेली अनेक वर्षे मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं होतं. अखेर आमदारांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.