यंदा आठ हजार घरगुती तर ३२ सार्वजनिक उत्सव वाढले
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा एक लाख ६०,४६४ घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल आठ हजारांहून अधिक घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर सार्वजनिक उत्सवाची संख्याही ३२ ने वाढली आहे.
गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पहायला मिळत आहे. दीड, तीन, पाच, सात दिवसांचे घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपतींच्या तयारीला वेग आला आहे. यावर्षी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये १०४३ सार्वजनिक तर तब्बल एक लाख ६०,४६४ घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.
अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजतगाजत आणण्यास सुरुवातही केली आहे. सोमवार, मंगळवार अमावस्या असल्याने अनेक मंडळांनी एक आठवडा आधीच म्हणजे शनिवार, रविवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाचे स्वागत केले आहे. उर्वरित गणपतींच्या मुर्तींचे आगमन बुधवारनंतर होणार आहे. तर दुसरीकडे घरी गणपती आणण्याचे प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात शनिवार, रविवार सुट्टी असल्याने यावर्षी उत्साहाला उधाण आले आहे. म्हणून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घरगुती गणपतींमध्य यंदा आठ हजारांची वाढ झालेली दिसते.
गेल्यावर्षी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक लाख ५३,६२२ घरगुती गणपतींची नोंद झाली होती. २०२२ मध्ये एक लाख ४०,३६६ घरगुती गणपतींची नोंद झाली होती. म्हणजे दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होत आहे. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांमध्येही घरी गणपती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त आहे.
एकीकडे घरगुती खासगी गणपतींची संख्या वाढत असताना यंदा सार्वजनिक गणपतींच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी १०११ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन झाले होते. तर यावर्षी त्यामध्ये ३२ सार्वजनिक गणपतींची भर पडली आहे.
परिमंडळानुसार गणपती
ठाणे: सार्वजनिक- १३२, घरगुती- १५१३७
भिवंडी: सार्वजनिक- १६३, घरगुती- १५६५०
कल्याण: सार्वजनिक- २८९, घरगुती- ५१६१७
उल्हासनगर: सार्वजनिक- २६१, घरगुती- ४९४६१
वागळे: सार्वजनिक- १९८, घरगुती- २८५९९
विसर्जनासाठीही यंत्रणा सज्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही परिमंळांमध्ये एकूण १७७ ठिकाणी गणेश मुर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तर ६४ कृत्रिम तलावही यावेळी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या गणपतींसाठी खारीगाव पारसिक रेतीबंदर, मासुंदा तलाव, नदी नाका, वर्हाळदेवी घाट, काल्हेर खाडी, दुर्गाडी गणेश घाट, उल्हासनदी, मोहना घाट, कल्याण खाडी, उपवन तलाव, कोलशेत खाडी येथे व्यवस्था केली आहे.
भिवंडीतही यंदा कृत्रिम तलाव
यंदा भिवंडीतही १० कृत्रिम तलाव, मुर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या ५४ वरून ६४ वर गेली आहे.