दादोजी कोंडदेव स्टेडियम अधिक सुसज्ज होणार

राज्य सरकारकडून ७.६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर

ठाणे: ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आता अधिक सुसज्ज होणार असून खेळाडूंना आणखी चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत. कारण दादोजी कोंडदेव स्टेडियममधील अंतर्गत कामांसाठी राज्य सरकारकडून सात कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम हे हक्काचे ठिकाण समजले जाते. या स्टेडियममध्ये क्रिकेटसह इतर अनेक इनडोअर खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण जिल्ह्यातून या स्टेडियममध्ये खेळाडू सरावासाठी येत असतात. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या स्टेडियमचा कायापालट केला होता. त्यामुळेच आयपीएल स्पर्धेदरम्यान आयपीएल टीमचे खेळाडूही सराव करण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये येत होते. नुकतेच या स्टेडियममध्ये सुसज्ज लाइट्स बसवण्यात आल्यामुळे येथे रात्रीचे सामने खेळणेही शक्य झाले होते. त्यासोबतच या स्टेडियममध्ये अंतर्गत सोयीसुविधा पुरवून ते अधिक सुसज्ज करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे प्रयत्नशील होते.

दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या अंतर्गत कामांसाठी निधी मिळावा, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. तसेच यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला जात होता. या पाठपुरावाला अखेर यश आले असून राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ठाणे महापालिकेला दादोजी कोंडदेव स्टेडियममधील अंतर्गत कामे करण्यासाठी सात कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला निधी हा प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ७५ टक्के हिस्सा असून यात महापालिकेला स्वतःचा २५ टक्के हिस्सा टाकून हे काम करायचे आहे.

दरम्यान, दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये मागील काही दिवसात झालेली कामे आणि त्यात अंतर्गत कामांसाठी राज्य सरकारने दिलेल्या या निधीमुळे आता दादोजी कोंडदेव स्टेडियम अधिक सुसज्ज होणार असून भविष्यात येथे आयपीएल सामने देखील खेळवता येऊ शकतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर खासदार शिंदेंनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल खेळाडूंनी त्यांचे आभार मानले आहेत.