दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर

मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर झाले असून दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा- द राइज’ला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दिग्दर्शित ‘शेरशहा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटसाठीचा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी मुंबई येथील ताज लॅन्ड्स एन्ड येथे पार पडला. या प्रसंगी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना या वेळी पुरस्कृत करण्यात आले. अभिनेता रणवीर सिंग याला त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘८३’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर ‘मिम्मी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री क्रिती सनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दूरचित्रवाणी आणि वेबमालिका क्षेत्रातील लोकप्रिय आणि यशस्वी कलाकृतीला या वेळी सन्मानित करण्यात आले. ‘स्टार प्लस’वरील ‘अनुपमा’ या मालिकेला यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला, तर ‘कॅन्डी’ या वेबमालिकेला सर्वोत्कृष्ट वेबमालिका म्हणून घोषित करण्यात आले. चित्रपसृष्टीतील आपल्या दीर्घ आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना सर्वोत्कृष्ट योगदानसाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्या अभिनंदन पत्रकात मोदी यांनी कलाकारांची स्तुती केली.