ठाण्यात दादा विरुद्ध भाई; वर्चस्वासाठी आरपार लढाई !

ठाणे : ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी येत्या काळात भाई अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा अर्थात वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असले तरी ठाण्याची जबाबदारी भाजपाने गणेश नाईक यांना दिल्याने येत्या काळात ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या विरोधात नाईक उभे ठाकल्यास आश्चर्य वाटायला नको.

पालघर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी पालघर हा ठाणे जिल्ह्याचा तालुका होता. या एकत्रित जिल्ह्यातून २४ आमदार आणि चार खासदार निवडून येत होते. त्यामुळे अहमदनगरनंतर मोठा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख होती. मुंबईपासून जवळ असलेल्या या जिल्ह्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष होते. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ठाणे जिल्ह्याला १८ आमदार, तीन खासदार मिळाले तर पालघरमध्ये सहा आमदार आणि एक खासदार आहे. हे दोन्ही जिल्हे आपल्याकडे राहावेत यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष आहे. या संघर्षामागे या दोन्ही जिल्ह्यात असलेल्या अर्धा डझन महापालिका हे एक कारण आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या भाजपचे नऊ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सात आमदार आहेत. असे असताना महापालिका भविष्यात सेनेची ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा आपल्याकडे ठेवायचा आहे. पण भाजपला राज्यात एकहाती सत्ता काबीज करायची असल्याने शिवसेनेचा हा गड जिंकायचा आहे. यासाठीच गणेश नाईक यांना शेजारच्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री करून देवेंद्र फडणवीस यांनी श्री. शिंदे यांचे पंख कापायला सुरुवात केली आहे. गणेश नाईक यांनी तर ठाण्यात येऊन दर दोन महिन्यानंतर गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार भरवण्याची घोषणा केली. या घोषणेने शिंदे गटात भूकंप झाला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत. शिंदे यांची ही नाराजी बरेच काही सांगून जात आहे.

राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार असताना गणेश नाईक तीन वेळेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांची जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रे आणि प्रशासनावर पकड आहे. ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर हेरली असून ठाण्याची जबाबदारी नाईक यांच्या शिरी देऊन एकनाथ शिंदे यांना नामोहरम करण्याचे ठरवले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. हिंदुत्व या मुद्द्यावर ही युती होऊन या महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. शिवसेनेत आता फूट पडल्याने पूर्वीची आक्रमक शिवसेना आता राहिली नाही. याचा फायदा उचलण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले असून त्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर गणेश नाईक यांना उभे केले आहे.

अनेकांना कदाचित माहीत नसावे आनंद दिघे यांच्या आधी शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख गणेश नाईक होते. त्याचे आनंद दिघे यांच्याबरोबर बिनसल्याने त्यांनी नवी मुंबई हा आपला गड करून एका भागापुरते आपले राजकारण मर्यादित ठेवले. पण नंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्यावर ठाणे जिल्ह्यावर एकछत्री अमल केला. नाईक यांनी जिल्ह्यात घराणेशाही आणली आणि महत्वाची पदे वाटताना आपल्या आगरी समाजाचा विचार केला असाही आरोप केला जातो. पण १५-२० वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणाचा कल बदलला आहे. दिघे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ शिंदे हे खणखणीत वाजणारे नाणे ठरले आहे. दिघे यांनी नव्वदच्या दशकात गणेश नाईक यांचा बेलापूर विधानसभा मतदार संघात पराजय करून सीताराम भोईर या नवख्या उमेदवाराला निवडून आणले होते. एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य आहेत. तर नाईक हे भूमिपुत्र आहेत आ संजय केळकर हे देखिल भाजपाची ताकद वाढवून सेनेची ठाण्यातील सद्दी संपविण्याच्या मताचे असल्याने येत्या काळात ठाणे जिल्ह्यात दादा विरुद्ध भाई हा सामना मतदारांना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.