विमानतळाला ‘दि.बा.’ यांच्या नावासाठी एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार

ठाणे : येत्या २४ जूनला ११ जिल्ह्यातील एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी करत ‘भूतो न भविष्यतो’ आंदोलनाचा इशारा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला आहे.

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले त्यावेळी ते बोलत होते.

आंंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही पण त्या विमानतळाला दिबांचे नाव लागलेच पाहिजे. अन्यथा फार मोठी क्रांती घडेल. या भागातील तसेच नवी मुंबईतील काही भागातील प्रकल्पग्रस्तांना प्लॉट दिले गेले नाहीत. प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले काही राखीव प्लॉट विकले गेले आहेत, असे समजते आणि त्याचाही अभ्यास सुरु आहे. ४० वर्षे होऊन सिडको प्रश्न मार्गी लावत नाही त्यामुळे सातत्याने आपल्याला आंदोलने करावी लागतात, अशी खंत श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

दिबा पाटील आमच्या जीवनातील आदर्श आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आंदोलनाची यशस्वी वाटचाल होत असून हा लढा सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. येत्या २४ जूनला किमान एक लाख लोकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणार असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पालघरमधून १५ ते २० हजार, भिवंडीतून २० हजार तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड, नवी मुंबईतून हजारो भूमिपुत्र आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात महामार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

केवळ आश्वासन नको, एक महिन्याच्या आत जेएनपीटी साडेबारा टक्के कार्यवाही सुरु झाली पाहिजे, १८ एप्रिल २०२१ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सिडको संचालक मंडळाने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करण्यात यावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनविलंब १२.५% भूखंड वाटप करण्यात यावे, २५ फेब्रुवारी २०२२ रोजी गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबाबत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन योग्य ते बदल करण्यात यावेत तसेच नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या बैठका घेऊन सोडविण्यात याव्यात, या मागण्यांसाठी रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले होते. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील ९५ गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व इतर प्रकल्प समितीच्यावतीने दास्तान फाटा येथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्यासह उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, सरचिटणीस कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी आदी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.