ठाणे: रेल्वे स्थानकात चहाप्रेमींना ३० मिली कमी चहा देणाऱ्या सात चहा स्टॉलच्या विरोधात वैधमापन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे, त्यामुळे चहामध्ये हात की सफाई करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
कोकण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री होत असते. सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र कोकण विभागचे शिवाजी काकडे, यांच्या सूचनेवरून नूकतीच कारवाई करण्यात आली.
तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे, पालघर जिल्ह्यातील वसई, रायगड जिल्ह्यातलतील पनवेल व कर्जत, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ या रेल्वे स्टेशनवर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी दिल्या.
तपासणीदरम्यान रेल्वे स्टेशनवरील चहा विक्री करणाऱ्या आस्थापनांना १५० ते १८० मिली एवढे चहा घोषित प्रमाण असताना तपासणीमध्ये ३० ते ८० मिली एवढा चहा कमी देत असल्याचे आढळून आले. अशा एकूण सात आस्थापनांवर वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये प्रकरण दाखल करण्यात आले.
वापरात असलेली तोलन उपकरणे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्यामुळे चार प्रकरणे दाखल करण्यात आली. चिपळूण व रत्नागिरी स्टेशनवरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतूदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामूळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकान्वय कोकण विभागाचे सह नियंत्रक,वैध मापन शास्त्राचे शिवाजी काकडे यांनी दिली.