झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे. लवकरच ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.