तीन तासांत १७ किमी सागरी अंतर पार !

सात वर्षांच्या संग्राशचा पराक्रम

डोंबिवली : संग्राश निकम (७) याने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान १७ किमी सागरी जलतरण करण्याचा संकल्प केला होता. ही मोहीम त्याने शुक्रवार १८ एप्रिल रोजी तीन तास ११ मिनिटांत फत्ते केली. १८ एप्रिल रोजी पहाटे ३:४५ वाजता, अंगाला ग्रीस लावून आणि समुद्राची पूजा करून संग्राशने अटल सेतूपासून पोहायला सुरुवात केली. अरबी समुद्रात चंद्रप्रकाशाच्या उजेडात त्याने सूर मारला. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक हिरेन रणपुरा यांच्या देखरेखीखाली त्याचे पोहणे सुरू होते.

समुद्रातील वाढते प्रदूषण, भरती-ओहोटीचा प्रभाव, मोठमोठ्या बोटींमुळे निर्माण होणाऱ्या लाटा, तसेच गेटवे ऑफ इंडिया जवळील पाण्यावरचा तेलाचा थर, या सगळ्यांमुळे त्याला त्रास झाला. उलटीसारखे वाटणे, तोंडात खारट पाणी जाणे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहावे लागणे यामुळे परिस्थिती अधिक कठीण झाली. अंधार असल्यामुळे दूरपर्यंत काही दिसत नव्हते. तरीसुद्धा, संग्राशने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एकही मिनिट विश्रांती न घेता सलग पोहत राहिला. सकाळी ६:५६वाजता तो गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला. म्हणजेच, त्याने १७ किलोमीटरचे अंतर तीन तास ११ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केले.

गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यावर प्रशिक्षक विलास माने, रवी नवले, अरुण, संतोष पाटील, त्याचे आई-वडील आणि नातेवाईकांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले. केवळ तीन महिन्यांपूर्वी संग्राशचे आई-वडील त्याला पोहायला शिकण्यासाठी यश जिमखानामध्ये घेऊन आले होते. केवळ आठ दिवसांत त्याने पोहायला शिकून घेतले. तो इतर मुलांचे सराव बघत असे आणि म्हणायचा, “सर, मला पण समुद्रात जायचंय, स्पर्धेत भाग घ्यायचाय.

यानंतर त्याला अ‍ॅडव्हान्स कोचिंग सुरू करण्यात आले. एक महिन्यानंतर त्याला उरण येथे संतोष पाटील यांच्याकडे दोन वेळा समुद्रात सरावासाठी नेण्यात आले. तेथे त्याने चांगला सराव केला. सध्या तो प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे धडे घेत आहे. यश जिमखानाचे मालक राजू वडनेरकर, मॅनेजर, आणि संपूर्ण स्टाफने संग्राशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.