फेरीवाला धोरण राबवा-आ.केळकर
ठाणे: शहरातील चौक आणि रस्त्यांवरील मोक्याच्या जागांवर बेकायदेशीरपणे कब्जा करून गावगुंड आणि काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना भाड्याने देऊन मोठ्या प्रमाणावर माया गोळा करत आहेत. यात कर्मचारीही हात धुवून घेत आहेत. या अनधिकृत व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने खून आणि हाणामारीच्या घटना ठाण्यात घडत आहेत.
ठाणे महापालिका प्रशासनाने मागील सात वर्षात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे अनेक गुंडांनी आणि राजकीय पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना आश्रय देऊन त्यांच्याकडून हप्तावसुली सुरू केली आहे. गोखले रोड, मुख्य बाजारपेठ, सिडको, जांभळीनाका, तलावपाळी, किसननगर, पूर्व ठाणे, अष्टविनायक चौक, महापालिका भवनसमोर, कलावती देवी मंदिर चौक, खोपट, वृंदावन, श्रीरंग, पडवळ नगर, मुलुंड चेक नाका, कळवा स्टेशन रोड, खारीगाव, मुंब्रा स्टेशन परिसर, गुलाब मार्केट, कौसा, दिवा-दातीवली रोड, वर्तकनगर नाका, शिवाई नगर नाका, वसंत विहार, घोडबंदर रोड येथील मानपाडा, माजीवडे, कासारवडवली, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. गावगुंडांना १०० ते ५०० रुपये हप्ता दरदिवशी दिला जातो, त्यानंतरच त्यांना धंदा करण्याची परवानगी दिली जाते आणि व्यवसायाला संरक्षण दिले जाते.
ठाण्यात महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे १३०० फेरीवाल्यांची नोंदणी आहे. प्रत्यक्षात मात्र हप्ते देऊन कितीतरी पटीने फेरीवाले ठाण्यात व्यवसाय करत आहेत. अनेक फेरीवाले हे कुर्ला, गोवंडी, भायखळा, दादर, घाटकोपर, कल्याण-डोंबिवली, मुंब्रा या भागांतून ठाण्यात येऊन व्यवसाय करतात. पोलीस, ठाणे महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि खासगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांचे देखील हात ओले करून बिनदिक्कत रस्त्यावर धंदा केला जात आहे.
ठाणे शहरात मंगळवारी अनधिकृत फेरीवाल्यांच्या वसुलीच्या वादातून एका फेरीवाल्याची हत्या झाली. फेरीवाल्यांचे अंतर्गत वाद आणि त्यातून वाढत असलेली गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी खंत व्यक्त केली तसेच फेरीवाला धोरण अमलात आणावा अशीही मागणी केली.