ठाणे: ठाणे महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
फुफानी कंपाऊंड, डोंगरीपाडा किंककाँग नगर येथे स्वप्नाली सोनावळे यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भाडे करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता, संबधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच, हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखाला विकले असल्याचे सांगितले. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. मात्र, जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता, हे घर माझे आहे. तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप महिलेचे पती अशोक सोनावळे यांनी केला आहे.
या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक सोनावळे हा पूर्वी माझा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. मात्र, त्याने माझ्या नावाचा गैरवापर करून सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकानाचे गाळे व रुम बांधल्या. तसेच काही जणांकडून पैसे घेतले होते. याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी तातडीने त्याला कार्यालयात येण्यास मनाई केली. त्याचा राग धरून त्याने समाजाची ढाल उभी करून माझ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा आधार घेऊन खोट्या तक्रारी व माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी निर्दोष असून, या संदर्भात पोलिस तपासात मला निश्चितच न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मनोहर डुंबरे यांनी दिली.