मुंब्र्यात १० मजली इमारतीला तडे

इमारत खाली करून २५ कुटुंबाचे स्थलांतर, ४३ खोल्याना सिल

ठाणे : मुंब्र्यातील अल्मास कॉलनी रोड येथील झोहा या धोकादायक इमारतीला तडे गेल्याने ठाणे महापालिकेने कारवाई करत तत्काळ खाली केली आहे. इमारतीमधील सर्व खोल्या सिल करून २५ कुटुंबांना हलवण्यात आले आहे.

मुंब्र्यातील अवघी २० वर्षे जुनी झोहा इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र इमारतीमधील रहिवाशांनी ठाण मांडले होते.

रविवारी आपत्ती व्यवस्थापनाला मिळालेल्या माहितीनुसार झोहा इमारतीच्या ‘सी’ विंगच्या (तळ+८ मजली इमारत) पिलरला तडे गेले होते. ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने कारवाई करत इमारत खाली केली. या इमारतीमध्ये एकूण ४५ फ्लॅट होते. तर इमारतीच्या टेरेसवरील तीनही मोबाईल टॉवर काढून घेण्याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

इमारत रिकामी केल्यानंतर सर्व खोल्या सील करण्यात आल्या असून सर्व रहिवाशांनी राहण्याची व्यवस्था स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे.