कचर्याचा ढिगारा उपसण्यास सुरुवात
ठाणे: डम्पिंग ग्राउंडची समस्या भेडसावत असल्याने ठाण्यातील सी.पी.तलाव येथील कचरा संकलन केंद्राची समस्या गंभीर रूप धरणांबकरू लागली आहे. मात्र आयुक्तांच्या हालचालीनंतर येथील कचरा भिवंडीतील आतकोली येथे हलविण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन महिन्यांत ही समस्या मार्गी लागणार असून रस्त्यावरील कचऱ्याची समस्याही दूर होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे शहरात सुरु असलेल्या कचरा कोंडीवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढिग दिसू लागले. गृहसंकुलांच्या ठिकाणी देखील कचऱ्याचे ढिग वाढू लागले. त्यात सीपी तलाव येथील साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याने सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनावर आगपाखड करावी लागली. येथील कचरा तत्काळ हलविण्याच्या सुचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मागील तीन ते चार दिवसांपासून सीपी तलाव येथील कचरा उचलण्याचे काम सुरु झाले आहे.
सध्या सी पी तलाव येथील सुमारे आठ हजार मेट्रीक टन कचरा उचलला गेला असल्याची माहिती महापालिकेने दिली. हा कचरा उचलण्यासाठी सध्या याठिकाणी १५ डंपर आणि सहा जेसीबी कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच येथील कचरा आता भिवंडी आतकोली येथे नेला जात असून त्यासाठी ४५ डंपरही रोजच्या रोज धावत आहेत.
शहरात कचर्याची समस्या गंभीर झाल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तत्काळ दखल घेत प्रशासनाची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांना स्वतः मैदानात उतरावे लागले आहे. त्यांनी रविवारी घनकचरा विभागाच्या संबंधित सर्व अधिकार्यांसोबत सी.पी.तलाव हस्तांतरण केंद्राची पुन्हा पाहणी केली. येथील कचरा तत्काळ उचलण्याच्या सुचना त्यांनी दिल्याच, पण घरोघरी, रस्त्यावर साठलेला कचराही सोमवारपासून उचलण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. त्यानुसार सोमवारी पहाटेपासून शहरातील विविध भागात कचरा उपसण्याची मोहिम सुरू झाली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेल्या घंटागाड्यांच्या फेर्या शहरात सुरू झाल्या आहेत. सोसायट्या, मोठी गृहसंकुलांमधील कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे. हा सर्व कचरा भिवंडी येथील आतकोली क्षेपणभुमीकडे रवाना होणार आहे. पण त्याआधी कचर्याच्या वर्गिकरणासाठी सी. पी. तलावाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथील ताण पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.