ठाणे: नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आदर्शने साप चावल्यानंतर तत्काळ योग्य पाऊल उचलल्याने त्याचा जीव वाचला. घोणस प्रजातीचा अत्यंत विषारी साप चावल्यानंतरही त्याने घाबरून न जाता आवश्यक प्रथमोपचार करून रुग्णालय गाठले आणि आपला जीव वाचवला. येऊरमध्ये ही घटना घडली. त्याच्या या धाडसी आणि सद्विवेक बुद्धीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
येऊरमधील एअर फोर्समध्ये राहणारा आदर्श धनावडे हा नवव्या वर्गात शिक्षण घेतो. रात्री नऊच्या सुमारास (ता. 20) तो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या स्कूटरजवळ आला असता स्कूटरच्या मागील चाकावर लपून बसलेल्या घोणस जातीच्या सापाने त्याच्या डाव्या पायाच्या दोन बोटांना दंश केला. आपल्याला सापाने दंश केला आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने घाबरून न जाता तत्काळ घरी जाऊन डाव्या पायाच्या गुडघ्याखाली दोरी गुंडाळली आणि एअर फोर्समध्ये असलेल्या रुग्णालयात गेला. रुग्णालयातील डॉक्टरांनी घटनेचे गांभीर्य पाहून योग्य ते औषध देऊन त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत आदर्शचा पाय सुजला होता. रात्री 11 च्या सुमारास सामान्य रुग्णालयात आलेल्या आदर्शवर तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्याला उपचारासाठी सामान्य वॉर्डात दाखल केले.
दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत आणखीन बिघडल्याने त्याला अति दक्षता विभागात हलवण्यात आले. त्याच्या शरीरात बऱ्यापैकी विष पसरले होते. शरीरात विष पसरल्यामुळे त्याला झटके येत होते. अति दक्षता विभागात त्याच्यावर तीन दिवस उपचार झाल्यानंतर त्याच्या जीवाचा धोका टळला. त्यामुळे त्याला (ता. 24) घरी सोडण्यात आले.
सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना कोणता साप चावला याचा फोटो आणि व्हिडिओ दाखवलेला असतानाही तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू न करता पोलिसांकडे जाऊन घटनेची नोंद करून येण्यास सांगितले. सापाची माहिती आणि रुग्णाची अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्याची आवश्यकता होती, मात्र तसे झाले नसल्याची खंत आदर्शच्या वडिलांनी व्यक्त केली.
साप चावल्यानंतर जी काळजी घेणे तत्काळ आवश्यक होते ती आदर्शने घेतल्याने पुढील धोका टळण्यासाठी मदत झाल्याचे एयरफोर्समधील डॉक्टरांनी सांगितले.