जिल्ह्यात नवीन सात तर ठाण्यात अवघा एक रुग्ण
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ अतिशय मंदावली असून ठाणे शहरात मागील दोन वर्षात पहिल्यांदाच फक्त एक नवीन रूग्ण सापडला आहे तर आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान नवी मुंबईतील चार नवीन रुग्ण धरून संपूर्ण जिल्ह्यात फक्त सात नवीन रुग्णांची नोंद आज झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त फक्त एका नवीन रुग्णाची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये पडली आहे तर उर्वरित सर्व प्रभाग समिती भागात कोरोना रूग्ण नोंदवला गेला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४२६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५१६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये केवळ एक जण बाधित मिळाला आहे. आत्तापर्यंत २३ लाख ९२,२०५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६१९जण बाधित मिळाले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी अवघे सात रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक चार रुग्ण हे नवी मुंबई महापालिका हद्दीत सापडले आहेत. तर सलग सहा दिवसात एकाचाही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका दोन नगरपालिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी चक्क कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी झाली आहे. आज नोंदविण्यात आलेल्या सात रुग्ण संख्येने आत्तापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या सात लाख ८६२१ झाली आहे. तर सहा लाख ९६,५०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण ११,८७८ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची २२९ इतकी आहे. आज ठामपा, उल्हासनगर आणि कुळगाव-बदलापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर नवीमुंबईत चार रुग्णांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण येथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.