ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगाने ; राज्यात बाधितांचे प्रमाण ११ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात करोना प्रादुर्भाव वाढतच असून बाधितांचे प्रमाण सुमारे ११ टक्क्यांवर गेले आहे. मागील आठवडाभरात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर हे जिल्हे वगळता राज्यभरात अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे आता केवळ मुंबई आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. परंतु रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात मात्र फारशी वाढ झालेली नाही.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ८ ते १४ जून या काळात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये १८ हजार ५२५ रुग्णांची नव्याने भर पडली. आठवडाभरातच म्हणजे  १५ ते २१ जून या काळात या जिल्ह्यांमध्ये नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून रुग्णसंख्येत ५० टक्क्यांहूनही अधिक वाढ ठाणे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. रुग्णसंख्या अधिक असलेले हे पाच जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात ७७९ रुग्ण नव्याने आढळले होते. परंतु मागील आठवडाभरात यातही जवळपास दुपटीने वाढ झाली असून १ हजार ४७३ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये आठवडाभरात सुमारे ८९ टक्के रुग्णवाढ झाली आहे.

करोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने बाधितांचे प्रमाण १५ दिवसांत सुमारे पाच टक्क्यांवरून सुमारे ११ टक्क्यांवर गेले आहे. मुंबईतील बाधितांच्या प्रमाणात दुपटीने वाढ होऊन १६ टक्के झाली आहे. तर याखालोखाल पालघर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १३ टक्क्यांहून जास्त आहे.

ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अन्य जिल्ह्यांमधील बाधितांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे आढळले आहे. राज्यभरात ५ जूनला २५ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षाही कमी होते. यातील १५ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जवळपास दीड टक्क्यांवर गेले असून दहा जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. जूनमध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात सरासरी दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून ४० हजारांवर गेली आहे. त्यामुळेही नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ

राज्यात ५ जूनला ६ हजार ७६७ रुग्ण उपचाराधीन होते. परंतु मागील १५ दिवसांत प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णांचा आलेख आता सुमारे २५ हजारांवर गेला आहे. राज्यभरात २५ जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या दहाच्या खाली होती. परंतु मागील १५ दिवसांमध्ये ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार होत असल्यामुळे आता केवळ चार जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्या दहाच्या खाली आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण ‘जैसे थे’

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण मात्र उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत साडेचार टक्केच राहिले आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येतही किंचित वाढ झाली आहे. परंतु हे प्रमाणही अजून सुमारे एक टक्काच आहे. कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या रुग्णांची संख्या मागील १५ दिवसांत तीन वरून २२ वर गेली आहे. परंतु उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ०.०५ टक्क्यावरून ०.०९ टक्क्यांवर गेले असून यात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येते.