कोरोना आऊट; पूर्वपरिस्थिती इन!

मुंबई – मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

या नव्या मार्गदर्शक सूचना एका पत्राद्वारे केंद्राकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश जारी करून, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी या पत्रात राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सचिवांनी या पत्रात राज्यातील तसेच जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पॉझीटिव्हिटी रेट या साऱ्याचा विचार करुन राज्यात सूचना जारी करण्यास सांगितल्या आहेत. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या या सूचनांचा मूळ उद्देश हा देशातील विविध आर्थिक व्यवहार सुरळीत करणे हा आहे.

नव्या मार्गदर्शक सूचना

-सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव यासह विविध समारंभावरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.
-शाळा, महाविद्यालये तसेच विविध कोचिंग क्लासेस अशा शैक्षणिक आस्थापना कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु करता येतील.
– रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आणि व्यायाम शाळा इत्यादी आस्थापना सुरु करता येऊ शकतात.
-लग्नसमारंभ तसेच अंत्यसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले जाणार आहेत.
-सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध त्याचप्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासासाठीचे निर्बंधही काढण्यात येणार आहेत.
-सरकारी तसेच खाजगी कार्यालयं कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरु करता येतील असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
वरील सर्व तरतूदी या त्या-त्या ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा अभ्यास करुन सुरु करण्याची महत्त्वपूर्ण सूचना या पत्रामध्ये देण्यात आली आहे.