* विद्या प्रसारक मंडळाच्या प्रयत्नांना यश
* उद्या अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन शाखेचे रूपांतर अभियांत्रिकी महाविद्यालयात होण्यासाठी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई आणि मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून व्ही.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
या निमित्ताने विद्या प्रसारक मंडळातर्फे २७ जुलै रोजी बाजीराव पेशवे सभागृहात उद्घाटन सोहळा प्रसिद्ध अणु शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्पुटर इंजिनीरिंग, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन या शाखांमध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थी असे मिळून एकूण ३०० विद्यार्थी प्रवेश घेऊन मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकी विषयातील पदवी मिळवू शकतील.
ठाणे शहरात रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या ठाणे कॉलेजच्या “ज्ञानद्विप “ शैक्षणिक संकुलात या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चार इमारतींचा समावेश आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त वर्ग खोल्या, दर्जेदार ग्रंथालय, दृक-श्राव्य माध्यमांची सोय असलेली सभागृहे, कॅन्टीन अशा आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.
हे अभियांत्रिकी महाविद्यालय विद्या प्रसारक मंडळच्या तंत्रनिकेतनातील गुणवत्तापूर्ण व अद्ययावत तंत्रशिक्षण देण्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीला नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप कुमार नायक यांनी व्यक्त केला आहे.
१९८३ सालापासून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या तंत्रनिकेतनाचे रूपातंर यंदा नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयात होत आहे आणि यापुढेही दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी विद्या प्रसारक मंडळ नेहमीच कटिबद्ध राहील,अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिली.
२७ जुलै रोजी सायंकाळी होत असलेल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उद्योजक, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक येणार आहेत. तंत्रनिकेतानातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक, कुशल तंत्रज्ञ, शिक्षण संस्थांमधील मान्यवर पदाधिकारी, निष्णात तंत्र सल्लागार म्हणून नावारूपास आले आहेत. त्यांची औचित्यपूर्ण उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे. उद्घाटन सोहळ्याची सांगता विद्या प्रसारक मंडळ सदस्य आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांच्या सुश्राव्य गायनाने होणार आहे.