कंटेनर चालकाची अनेक वाहनांना धडक

अंबरनाथ: आंनदनगर एमआयडीसी येथील सुदामा हॉटेल ते आंनदनगर एमआयडीसी पोलीस चौकी दरम्यान एका बेफाम झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळी अंबरनाथला घडली. होते.

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर चालकाने महामार्गावरील अनेक वाहनांना धडक दिली. तसेच कंटेनर मागे पुढे नेत अनेक वाहनांना धडक देत होता. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक गुजराज सुरेंद्र कुमार ( २४ ) रा. गुरदासपूर, पंजाब याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान चालकाने यावेळी मद्यपान केले होते का? याचा देखील तपास पोलिसांकडुन सुरू आहे. अपघातात पोलीस चौकी समोरील पोलिसांची एक दुचाकी तसेच दोन ऑटोरिक्षा आणि एक कंटेनर अशा चार वाहनांचे नुकसान केले आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. कंटेनर चालकाचा हा प्रताप पाहून राज्य महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कंटेनर चालकाच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी वाहनचालक सैरावैरा पळत होते. वाहतूक पोलिसांनी या कंटेनर चालकाला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र चालकाने कोणाचेही ऐकले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

नागरिकांच्या आरडाओरडानंतर देखील हा कंटेनर चालक कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कंटेनर चालकाने अक्षरशः राज्य महामार्गावर धुडगूस घातला होता. अखेर कर्तव्यावरील पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. अखेर एमआयडीसी परिसरातील एनालटेक फार्मा कंपनीजवळ कंटेनर चालकाने कंपनीबाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि त्याच जागी पोलिसांनी कंटेनर मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले.