एमआयडीसीकडून महापालिकेच्या पत्राला केराची टोपली?
नवी मुंबई : महापे एमआयडीसी भागात नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केल्याप्रकरणी कार्यवाही करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने कार्यवाही करावी म्हणून एमआयडीसीला पत्र देऊनही कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने दुबार पत्र देण्यात आले आहे.
महापे एमआयडीसी भागात हनुमान नगरमधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर खासगी कंपनी धारकांकडून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याबाबत मनपा कोपरखैरणे विभागात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यात नाल्यावर बांधकाम केल्याचे दिसून आले. हा नाला महापे हनुमान नगरमधून जाऊन मिलेनियम बिजनेस पार्क, रिलायन्स कंपनी होऊन पुढे ठाणे-बेलापूर मार्गावर निघतो. त्यामुळे पावसाळ्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या भागात वित्त तसेच जीवितहानी होऊ शकते.
या प्रकरणी उचित कार्यवाही करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने एमआयडीसी प्रशासनाला दोन वेळा पत्र दिले आहे. मात्र या पत्राला एमआयडीसीने केराची टोपली दाखवली आहे.
महापे एमआयडीसी भागात हनुमान नगरमधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर बांधकाम झाल्याबाबत पाहणी करून कार्यवाही करण्याबाबत नवी मुंबई महानगर पालिकेचे पत्र आले आहे. त्यानुसार स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना सादर केला जाईल, अशी माहिती उप अभियंता संतोष कळसकर यांनी दिली.