वादग्रस्त पोस्टमुळे काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण

ठाणे : चैत्र नवरात्र उत्सव झाला राजकीय आखाडा अशा आशयाचा मेसेज सोशल मिडियावर टाकणाऱ्या गिरीश कोळी यांना काही अज्ञात व्यक्तींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या विरोधात कॉंग्रेसने आवाज उठवला आहे.

ठाण्यात गुरुवारी या संदर्भात कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद केली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशचे पदाधिकारी मनोज शिंदे, प्रवक्ते सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कोपरीत काही अज्ञातांनी कोळी यांना अडवून साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो, त्यांना बदमान का करतो, असे सांगत पोस्ट डीलीट करण्यास सांगितले. तसेच दोघांनी त्यांना मारहाण देखील केली. त्यानंतर भितीपोटी कोळी यांनी ती पोस्ट डिलीट केली. त्यानंतर याविरोधात कॉंग्रेसने संबंधितांना तत्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी केली. तर हा एक भ्याड हल्ला असून ज्याने मारहाण केली तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचा आरोप मनोज शिंदे यांनी केला. केवळ आपले महत्व वाढविण्यासाठी त्यांनी हा भ्याड हल्ला केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर पुढील २४ तासात संबधींताना अटक करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी शिंदे यांनी केली.

कारवाई न झाल्यास मारहाण करणाऱ्यांच्या घराबाहेर आंदोलन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ दहशतीचा हा भाग असून लोकशाही चेपण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आ. जितेंद्र आव्हाड यांचे मारहाणीवर ट्विट
आव्हाडांनी या ट्वीटमध्ये सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा ठाणे काँग्रेसचा प्रवक्ता गिरीश कोळी याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी चोप दिला. तसेच, ती आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागण्यात आली. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं, तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार. जेलमध्ये सडवणार”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप नोंदवला आहे.