काँग्रेस आमदार थेट आनंद आश्रमात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ठाणे : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला. तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला तर एका उमेदवाराचा पराभव झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाईची टांगती तलवार असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील आनंदाश्रमात पोहोचले.

ही भेट अतिक्रमण संदर्भातील होती, असे हिरामण खोसकर यांनी म्हटलं असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गट किंवा अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत, असं विधान केलं होतं. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने ज्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये खोसकर यांचाही समावेश आहे का? अशीही चर्चा आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी सांगितले त्यांनाच मतदान केले. माझ्यासह सात आमदारांना मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी सांगितले होते, आम्ही केले. जयंत पाटील यांना ज्या सहा आमदारांनी मतदान केले त्यांचे मत फुटले, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाहीत, त्या सहा जणांवर कारवाई का करत नाही? अशी विचारणा त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांना 23 मते पडणार होती, त्यातील एक मत फुटलं आहे. नाना पटोले, के.सी. पाडवी यांच्यासह सात जणांनी मिलिंद नार्वेकर यांना मतदान केले. मी मराठीत मतदान केले, माझ्यावर संशय आहे तर माझी मतपत्रिका कोर्टाची ऑर्डर घेऊन चेक करावी, त्यांना लगेच कळेल, आम्ही दोन जणांनी मराठीत मतदान केले आहे, त्यामुळे मतपत्रिका सापडेल. मी दोषी असेल तर माझी पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा माझी बदनामी थांबवा. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांना माहिती आहे ते सहा जण कोण आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.