विधानसभेसाठी ठाण्यात आजपासून काँग्रेसच्या बैठका

ठाणे : ठाण्यातील विधानसभेच्या जागेवरून एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये दावे प्रतिदावे केले जात असताना आता काँग्रेसकडून देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा स्तरावर बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

२३ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात जिल्हा व ब्लॉक स्तरावरील बैठका घेण्यात येणार असून यामध्ये चिंतन आणि मंथन करण्यात येणार आहे.

ठाण्यात काँग्रेसची फारशी ताकद नसली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी प्रदेश स्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील पदाधिकारी कामाला लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यात काँग्रेस विविध गटातटांमध्ये विभागली आहे. लोकसभा निवडणुकीत भिवंडीच्या जागेवर काँग्रेसला पाणी सोडावे लागले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, या हेतूने बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या सूचनेनुसार स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. यामध्ये २३ जुलै रोजी जिल्हास्तरावर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारणी, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाप्रभारी यांची बैठक घेतली जाणार आहे. २५ ते ३० जुलैदरम्यान ब्लॉक स्तरावर ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारणी, ब्लॉकमधील जिल्हा पदाधिकारी व जिल्हा प्रभारी यांची बैठक होणार आहे. तसेच १ ते १० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील बूथ कमिट्या व बीएलए यांची व ५ ते १५ ऑगस्ट काळात आघाडी संघटना, विभाग आणि सेल यांची बैठक होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मतदार नाव नोंदणीबाबत आढावा, सरकार विरोधी मागील तीन महिन्यातील व येत्या काळात होणाऱ्या आंदोलनांचा आढावा आणि नियोजन व सोशल इंजिनिअरिंगबाबत बैठकांमध्ये खल होणार आहे. यासोबतच बूथ कमिटी व बीएलएबाबत आढावा यावेळी घेतला जाणार आहे.