सक्षम नेतृत्वाअभावी ठाण्यात काँग्रेसची वाताहत

* माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांचा हल्लाबोल
* काँग्रेससोबत असल्याचा दावा

ठाणे: ठाणे शहरात काँग्रेसला सक्षम नेतृत्व नसल्याने शहरात पक्षाची वाताहत झाली असून कळवा विभागात तर पक्षाचा एकही नगरसेवक नसल्याचा हल्लाबोल माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांनी केला आहे. पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षाची जुनी जाणती मंडळी कार्यरत झाली असून आम्ही काँग्रेससोबत आहोत, पुढेही कायम राहणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याचा ठपका ठेवत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी साळवी यांना निलंबित केले. या आरोपाला साळवी यांनी जशास तसे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

साळवी यांच्या मते, विक्रांत चव्हाण ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून पक्ष संपत चालला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस शैलेश शिंदे, अनिल भगत, संजय शिंदे, जगदीश गौरी, दिनेश शिळकर यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडली आहे. ठाणे महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 12-13 नगरसेवकांवरून तीनवर आले असल्याचेही साळवी यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान मिळाल्याचे सांगत साळवी यांनी आरोप केला की, विक्रांत चव्हाण यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलले जाते. साळवी यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा धर्म पाळत 2009 ते 2019 पर्यंत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, 2024 मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा डावलण्यात आले. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही.

साळवी यांनी स्पष्ट केले की, “आमचा डीएनए काँग्रेसचाच आहे. जे गद्दारीचा आरोप करतात, त्यांनी आपल्या घरातील गद्दारीचा इतिहास तपासावा.” असा टोला मारत अनिल साळवी यांनी विक्रांत चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी आमदारांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोपही केला.