काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली 39 जणांची यादी जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसने आज (8 मार्च) पहिली उमेदवार यादी जाहीर केली. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे आहेत. वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयातील व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत. काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.

दरम्यान, भाजपकडूनही पहिली यादी 195 उमेदवारांची घोषित करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही. यावरून महायुतीमध्ये असलेल्या जागावाटपावरून सुरु असलेल्या घडामोडींचा अंदाज येतो. दुसरीकडे, काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही एकमत झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा अजूनही निकालात निघालेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आलेल नाही.