ठाणे : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्याने काँग्रेस अधिक सतर्क झाली आहे. निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका या आधीच घेणाऱ्या काँग्रेसने राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या ठाण्यात इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून माहीती भरून घेण्यात येत असून यामध्ये प्रामुख्याने पक्षांतर्गत कामाची व अनुभवासह इतर माहीती मागविण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत कोणतीही आघाडी होईल अथवा न होईल याचा सारासार विचार करून काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक प्रभागात आपापल्या उमेदवाराची चाचपणी करण्याची सुरूवात करून एकप्रकारे एकला चलो रे चीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यानुसार ठाण्यातही शहर कॉंग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.
ठाण्यातील काँग्रेसने यापूर्वीच आगामी निवडणुकीची तयारी चालू केली असून नवीन प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात कॉग्रेस पक्षातून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून सूचना येतील त्याच पद्धतीने कॉग्रेस आपली भूमिका निश्चित करेल, असे मत कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले आहे.