ठाणे : ठाणे महापालिकेला अर्थसंकल्प फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका मुख्यालयासमोर काँग्रेसने लाक्षणिक आंदोलन सुरु केले आहे. कारवाई झाली नाही तर यापुढे पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आमरण उपोषण करण्याबरोबरच याविरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधीच फुटला असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या समोरच गोंधळ घातला होता. यावेळी ठाणे महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तर पालिकेच्या या कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला होता.
शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच विक्रांत चव्हाण तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केले.यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.