* छोटे पक्ष संपवण्याचा रिपाइं-मनसेचा आरोप
* उपायुक्तांनी व्यक्त केली दिलगिरी
उल्हासनगर : आज टाऊन हॉलमध्ये हरकती-सुचनांवरून कमालीचा गोंधळ उडाला असून आत बोलावले जात नसल्याने भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी चक्क प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले तर प्रारूप रचनेत पालिकेने छोटे पक्ष संपवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उपमहापौर भगवान भालेराव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे.
हरकती-सूचनांवर सुनावणीसाठी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजण्याचा वेळ पालिकेने नागरिकांना दिला होता. त्यानुसार आमदार गणपत गायकवाड हे पदाधिकाऱ्यांसोबत टाऊन हॉलमध्ये आले. तिथे उपस्थित असणाऱ्या निवडणूक अधिकारी उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी हॉलमध्ये गायकवाड यांना येऊ दिले नाही. कार्यकर्त्यांनी आरडाओरड केल्यावर राजपूत यांनी सर्वांना आत येण्यास सांगितले.
या प्रकाराने संतप्त झालेले आमदार गणपत गायकवाड यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनवधानाने काही चूक झाली असेल तर पालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते असे राजपूत यांनी सांगितल्यावर प्रकरण निवळले. दरम्यान उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार आदींनी प्रारूप रचनेत अनपेक्षितपणे अदलाबदल करण्यात आल्याचा आरोप करत त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असे सांगितले.