मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत घोडबंदरच्या मार्गावर कोंडी

गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात

ठाणे : शनिवारी मध्यरात्री २.४५च्या सुमारास ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाला जुना टोलनाका येथे अपघात झाला. मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याने घोडबंदरच्या दोन्ही मार्गावरील अवजड वाहने त्याच ठिकाणी अडकून पडली. परिणामी मध्यरात्रीपासून झालेली वाहतूक कोंडी पहाटेपर्यंत तशीच राहिल्याने सकाळी निघालेल्या वाहनांना देखील या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका पडला. सुदैवाने रविवार असल्याने सकाळी फारशी वाहने रस्त्यावर उतरली नव्हती.

शनिवारी मध्यरात्री गर्डर वाहून नेणाऱ्या पुलर या वाहनाला जुना टोलनाका या ठिकाणी अपघात झाल्याने मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणात घोडबंदरच्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या मार्गावर गायमुख घाट ते वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे ठाण्याहून बोरीवली, वसई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना तब्बल एक तासांपेक्षा अधिक काळ त्रास सहन करावा लागला.

अपघातग्रस्त वाहन अतिअवजड असल्याने दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका पुलर वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे कार्य सुरू केले. सुमारे तीन तासानंतर हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. या मार्गावरून मध्यरात्री गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ‌अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी १० नंतरही येथील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नव्हती. या वाहतूक कोंडीमुळे बोरीवली, वसई, विरार, मिरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.