भावी डॉक्टरांची रशियात कोंडी

ठाण्यातील खाजगी संस्थेने लावला कोट्यवधींचा चुना

ठाणे : परदेशात आपल्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवणार्‍या पालकांची ठाण्यातील संस्थाचालकाने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना रशियात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवल्यानंतर संस्थाचालकाने जबाबदारी झटकल्यामुळे मोठा पेच उभा राहिला आहे.

एकीकडे नवख्या देशात अडकलेली स्वत:ची मुले तर दुसरीकडे लाखोंची फी उकळून संस्था चालकाने केलेली फसवणूक अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या पालकांनी न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दार ठोठावले आहे. या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेही आता मैदानात उतरली असून अपर पोलीस आयुक्तांचीही (गुन्हे) याप्रश्नी भेट घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या आलोक हॉटेलशेजारी इसीओ अर्थात एज्युकेशन ओव्हरसीज कन्सल्टन्सी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे रशिया येथील जॉर्जिया भागात मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, भुसावळ, विरार या शहरातील तब्बल १८ मुले व मुली वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवली होती. या मुलांमागे प्रत्येकी २० ते २५ लाख रुपये फी म्हणून आकारण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, घरभाडे, जेवण आदींचा समावेश होता. मात्र इसीओ संस्थेचे संस्थाचालक सागर साळवी यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रशियात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. माझ्याकडे पैसेच शिल्लक नसल्याचे सांगत साळवी यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी झटकल्याने चिंताग्रस्त पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांची भेट घेतली. पालकांनी त्यांची कर्मकहाणी पाचंगे यांच्यासमोर मांडताच त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले. मोराळे यांनी याप्रश्नी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाचंगे यांनी दिली.