ठाण्यात संमिश्र बंद

ठाणे : जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच मराठा आरक्षणासाठी सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला ठाण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या वेळी बंदचा परिणाम जाणवला असला तरी दुपारी २ नंतर मात्र परिस्थिती सामान्य झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळी रस्त्यावर वाहने कमी पाहायला मिळाली मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बंदचा काहीच परिणाम झाला नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील दुकाने, मॉल बंद होते, मुख्य बाजारपेठही १०० टक्के बंद होती. सुरुवातीला मनसेच्या वतीने टीएमटी अडवण्याचा प्रयत्न झाला. तर माजिवडा या ठिकाणी भाजपने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने बंदच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर दुपारी ४ वाजता या बंदची सर्वपक्षीयांच्या वतीने सांगता करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

ठाण्यात पुकारण्यात आलेल्या या बंदला सर्वपक्षीयांनी पाठींबा दिल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी ठाणे बंदसाठी मनसे रस्त्यावर उतरली होती. रिक्षा, खासगी वाहन व दुकानदारांना दुकान बंद करण्याचे आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी केले. पाचपाखाडी भागात टीएमटी सेवा रोखण्याचा प्रयत्न बंद सर्मथकांकडून करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने या मार्गावरील बस पुढे रवाना झाली. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त पाहण्यास मिळत होता. त्यातही माजिवडा गोकुळनगर भागातही सकाळी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतले.

कोपरीतही मराठा समाजाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यांनी प्रत्येकाला विनंती करुन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोपरीतील दुकाने व इतर आस्थापना १०० टक्के बंद असल्याचे चित्र दिसून आले.

कोपरी-पाचपाखाडी या भागातील कोपरी, वागळे इस्टेट, इंदिरा नगर, किसन नगर आदींसह इतर भागातील दुकाने व इतर आस्थापना या पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाजवळ अज्ञात व्यक्तींनी रविवारी रात्री बॅनर लावले होते.

घोडबंदरच्या काही भागात बंद यशस्वी होत असतांना अंतर्गत भागात मात्र या बंदचे पडसाद उमटल्याचे दिसून आले नाही. येथील दुकाने आणि इतर आस्थापना सुरु होत्या. तसेच इतर व्यवहारही सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले. दुसरीकडे कळवा, मुंब्रा, दिवा तसेच राबोडी भागातही बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. ३ नंतर सर्व परिस्थिती सामान्य झाल्याचे दिसून आले.