कल्याण: सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रात्रीच्या सुमारास रहिवासी परिसरात गोंधळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
रुपेश कनोजिया असे त्याचे नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या कनोजिया याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची त्याच परिसरातून वरात देखील काढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया एका ठिकाणी एकाला मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. रुपेश पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी चारही बाजूने घेरून अटक केली आहे. २०२१ पासून रुपेशने गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या भूमिकेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
कल्याण पूर्वेत गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असतो. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात. पोलिसांसमोर गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहे. सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.