स्मार्टसिटी अंतर्गत ३९पैकी १४ प्रकल्प वेळेत पूर्ण करा

ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

ठाणे : ठाणे स्मार्टसिटी अंतर्गत ठाणे पूर्व कोपरी ते ठाणे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील सॅटीस प्रकल्पातील पूल, खाडी सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रकल्प अशा ३९ पैकी १४ प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले.

ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचे काम नियोजित वेळेनुसार सुरू असून पुलाच्या बांधणीसाठी एकूण 58 खांब नियोजित आहेत. या खाबांपैकी एकूण 48 खाबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नऊ खांबांचे काम सुरू असून त्यापैकी काही खांब हे शासकीय जागेत उभारावयाचे आहेत. त्या जागेसंदर्भात संबंधित शासकीय आस्थापनांना पत्रव्यवहार करण्याचे आदेश देत सुरू असलेली प्रकल्प कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे स्मार्ट सिटी विभागाला दिल्या आहेत.

खाडीकिनारा सुशोभिकरण प्रकल्प स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेला आहे. ही सर्व कामे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असून येत्या पाच महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन केले आहे. सदर कामे अधिक गतीने पूर्ण करुन कोणत्याही परिस्थितीत ही सर्व कामे पूर्ण होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत श्री. बांगर यांनी दिल्या.

शहरात १० ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रकल्पापैंकी नऊ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित एक प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या नाल्याची कामे 31 जानेवारी 2023पर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेल्या एकूण 39 प्रकल्पांपैकी सद्यस्थितीत सुरू असलेल्या १४ प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. ठाणे व मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला. शहरातील भुयारी गटार योजनांची कामे देखील वेळेत करण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात आतापर्यत एकूण ४०० पैकी ३३० कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित ७० कॅमेरा जोडणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या.

आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर आदी उपस्थित होते.