नवी मुंबई: सर्वसाधारण ग्राहकांना भाव वाढल्यानंतर कांदा हा रडवत असतो. मात्र यंदा बाजारात कांद्यापेक्षा बटाटाच वरचढ ठरत असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चढेच आहेत.
यंदा बटाट्याचे २०टक्के उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याची आवक कमी असून मागणी जास्त आहे, त्यामुळे दरवाढ होत आहे. सोमवारी बटाटा १९ ते २३ रुपयांनी विक्री झाला. तर मागील वर्षी मेमध्ये १० ते १२ रुपयांनी बटाटा उपलब्ध होता.
वाशीतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत सध्या बटाट्याची आवक कमी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के उत्पादन कमी आहे, त्यामुळे यंदा बटाट्याच्या दरात तेजी आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
बाजारात सध्या कांदा १८ ते २२ रुपयांनी उपलब्ध आहे. बटाटा १९ ते २३ रुपयांनी विक्री होत आहे. बाजारात नवीन बटाटा दाखल होताच दर आवाक्यात येतात. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे बटाट्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. परिणामी उत्पादन कमी आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बटाट्याचे दर चढेच आहेत. पुढील कालावधीतही बटाट्याच्या आवकीवर दरातील चढ-उतार पहावयास मिळतील, मात्र यंदा बटाट्याचे दर अजून महिनाभर तरी चढेच राहतील, अशी शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.