‘दृष्टि २०२५’ मध्ये पत्रकार प्रसन्ना जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
वावीकर आय इन्स्टिट्यूट व ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे: विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी संवाद कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असून संवाद हे प्रत्येक क्षेत्राचे मूलभूत शस्त्र आहे, असा यशाचा मंत्र ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी यांनी मुलाखतीतून दिला.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दृष्टि २०२५’ या कार्यक्रमात ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रसन्न जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या विचारांना नवे आयाम दिले. पत्रकारिता, सोशल मीडिया आणि संवाद कौशल्य यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाने डिजिटल युगात यशस्वी होण्यासाठीच्या तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव दिला.
निखिल बल्लाळ यांनी संवाद साधताना प्रसन्ना जोशी यांनी जर्नलिझम, सोशल मीडिया आणि संवाद कौशल्य या विषयांवर सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या डिजिटल युगात केवळ एखाद्या न्यूज चॅनलसाठी काम करणारी व्यक्तीच पत्रकार असते असे नाही. सोशल मीडियावर रील्स, पोस्ट, फोटो यांच्या माध्यमातून संवाद साधणारी प्रत्येक व्यक्तीही एका अर्थाने जर्नलिस्टच आहे. संवाद साधणे आणि योग्य माहिती पोहोचवणे हेच जर्नलिझमचे मूळ असल्याचे श्री.जोशी यांनी स्पष्ट केले.
न्यूज चॅनल्सचा इतिहास उलगडताना जोशी यांनी भारतातील प्रसारमाध्यमांचा प्रवास रेडिओपासून सॅटेलाइट चॅनल्सपर्यंत कसा विकसित झाला याचे उदाहरणांसह विवेचन केले. आज देशात २५० हून अधिक न्यूज चॅनल्स असून, महाराष्ट्रात नऊ मराठी न्यूज चॅनल्स कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जर्नलिझममधील “इंटरेस्टिंग” आणि “महत्त्वपूर्ण” बातमी यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रेक्षकांना काय हवे आहे आणि समाजासाठी काय आवश्यक आहे, यामधील समतोल साधणे हे पत्रकाराचे खरे कसब आहे. तसेच मीडिया इन्फॉर्मेशन लिटरसीचे महत्त्व अधोरेखित करत, डिजिटल माध्यमांवरील डेटा सुरक्षितता, फोटो-व्हिडिओ शेअर करताना परवानगीची गरज आणि चुकीच्या कंटेंटमुळे होणारे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना सजग केले. “कोणतीही बातमी देण्यापूर्वी तिची सत्यता तपासा, त्या माहितीचा फायदा कोणाला होणार आहे, ती माहिती समाजासाठी त्रासदायक ठरणार नाही ना, हे स्वतःला प्रश्न विचारा,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक छळ होत असल्यास न घाबरता पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे उपस्थित होते.