ठाणे : ख्रिसमसला सध्या ‘सिक्रेट सांता’ हा नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत भुरळ घालत आहे. याच अनुषंगाने बाजारपेठेत सांताक्लोज पोशाख व सिक्रेट सांता गिफ्ट पिशवीला मोठी मागणी वाढली आहे.
डिसेंबर महिना सुरू झाला की, वर्षाच्या शेवटचा ख्रिसमस सणाचा आनंदी काळ सुरु होतो. ख्रिस्ती बांधवांच्या घरात महिनाभर नाताळाची तयारी, घराघरांत सजावट, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, रंगीबेरंगी गिफ्ट्स, सिक्रेट सांता आदी अनेक गोष्टींसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. “जिंगल बेल, जिंगल बेल” या गाण्यांचा उत्साह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालत असून सर्व ऑफिस, हॉटेल, मॉल याठिकाणी सिक्रेट सांतासाठी मोठी जय्यत तयारी सुरू आहे. तसेच सिक्रेट सांता ही ख्रिसमसची पाश्चात्य ख्रिसमस किंवा सेंट निकोलस परंपरा असून त्यात भेट देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाते. मात्र यंदा सिक्रेट सांता बाबांकडून काय गिफ्ट मिळणार याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
कळव्यातील श्री रामलीला ड्रामा कॉस्ट्यूम येथे विविध आकाराचे व प्रकाराचे सिक्रेट सांता पोशाख भाडे तत्वावर उपलब्ध असून नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू बनले आहे. यात छोट्या मुलांसाठी भाड्याने मुलांसाठी 300 ते 500 रुपये, मुलींसाठी 350 ते 500 रुपये तर मोठ्यांसाठी भाड्याने 500 ते 1000 रुपये उपलब्ध आहेत. या भाड्याच्या कपड्यांसोबत सांता गिफ्ट पिशवी, सांता कॅप, सांता मेकअप मटेरियल, रेन डीअरचे कपडे, आदी असे सर्व वयोगटासाठी भाड्याने उपलब्ध आहेत. सध्या सिक्रेट सांता पोशाख व रेन डीअर कॉस्च्युमला जास्त मागणी असल्याचे विक्रेत्या आरती अग्रहरी आणि रविकांत अग्रहरी यांनी सांगितले.
सध्या ठाण्यातील अनेक शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या प्रमाणावर साजरे होत असून यासाठी कोळी, प्राणी, पोलिस, देवी, सांता, राजस्थानी, आदी पोशाखांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याचे विक्रेत्या आरती अग्रहरी आणि रविकांत अग्रहरी यांनी सांगितले. छोट्या मुलांसाठी 300 रुपये आणि मुलींसाठी 350 रुपये भाड्याने ही पोशाख उपलब्ध असून या पोशाखांसोबत दागिने, सांता पिशवी व मेकअप, देवी साहित्य, आदी गोष्टी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत.