गृहनिर्माण सोसायट्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध

ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे यांचे वचन

ठाणे : मोफा कायदा रद्द करणे, तंटामुक्त सोसायटी अभियान यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या तमाम अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे वचन सीताराम राणे यांनी दिले.

ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलच्या माध्यमातून ‘कपबशी’ या चिन्हावर उभे ठाकलेल्या सीताराम राणे यांनी रविवारी कळवा येथे सोसायट्यांच्या शेकडो सभासदांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुक येत्या ८ जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत गेली १५ वर्षे फेडरेशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य महासंघाचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या सीताराम राणे यांचे समर्थ सहकार पॅनल रिंगणात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी अपूर्व योगदान देणाऱ्या राणे यांच्या पॅनेलला कळवा येथील सोसायट्यांनी उत्स्फूर्त पाठींबा दर्शविला. रविवारी कळवा दत्तवाडीतील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ‘कपबशी’ या निशाणीवर शिक्का मारण्याचा निर्धार शेकडो सदस्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी, बोलताना सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशनच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. डिम्ड कन्व्हेअन्स योजनेत कागदपत्रांची संख्या कमी करून ही योजना सुलभ करण्याबरोबरच महत्वाची ओसीची अट रद्द केली. गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या थकबाकी वसुलीबाबत दिलासा दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थाच्या हिशोब व लेखा परिक्षणाच्या कालावधीला शासनाकडुन मुदतवाढ मिळवुन दिली. कोविड काळात विविध प्रकारे मदतीसह व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबवुन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर होणारी पोलीस कारवाई न करण्यासाठी दिलासा मिळवुन दिला. यांशिवाय महसुल विभागाच्या अकृषिक कर (एन.ए.) वसुलीला प्रखर विरोध करून थेट न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे शासनाने एन. ए.ला तात्पुरती स्थगिती देऊन सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या कमिटीची स्थापना केली आहे. शासनाच्या तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान सोसायट्यांमध्ये राबवण्यासाठी हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातुन मोलाची भूमिका बजावल्याचे राणे यांनी सांगितले.

ठाणे हाऊसिंग फेडरेशनसाठी यापूर्वी दिलेली जवळजवळ सर्वच आश्वासने पूर्ण केली आहेत. आता मोफा कायदा रद्द करण्यासाठी तसेच, सोसायट्यांच्या स्वयंपुर्नविकासासाठी शासनाने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करणार असल्याचा विश्वास सीताराम राणे यांनी व्यक्त केला.

सध्या काही विरोधक वकिल संघटनेच्या माध्यमातुन निवडणुक लढवत आहेत. या मंडळीना फेडरेशनचे व्यापारीकरण करायचे आहे. परंतु,असे व्यापारीकरण आम्ही होऊ देणार नाही. सोसायट्यांनी पै पै करून जमवलेल्या कोट्यवधीच्या पूंजीचा नेमलेल्या प्रशासकांनी अपहार केला. हा अपहार करणाराही वकील संघटनेपैकीच असून त्यांच्याकडून ही रक्कम परत मिळवुन देण्यासाठी आम्ही उभे राहु. या वकील संघटनेचे सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी योगदान काय? आजवर काय केले? वकील म्हणुन सोसायट्यांच्या वतीने किती वेळा कोर्टात उभे राहीले? असे परखड सवाल सीताराम राणे यांनी केले आहेत.

ठाण्यातील मतदारांसाठी ठाण्यातील नौपाडा,घंटाळी येथील ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या शाळेत येत्या ८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होत आहे. एकुण पाच मतपत्रिका असून मतदारांना २१ उमेदवारांच्या नावासमोर शिक्का मारायचा आहे.