भिवंडीतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

भिवंडी : मुंबईतील घाटकोपर येथे मोठे होर्डिंग्ज कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी १६ मे २०२४ रोजी तातडीने सर्व प्रभाग अधिकारी, शहर विकास अधिकारी, परवाना विभाग प्रमुख यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त मुख्यालय व अतिक्रमण नयना ससाणे, नगर रचनाकार अनिल येलमाने व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अचानक आलेल्या वादळामुळे व अतिवृष्टीमुळे शहरात झालेल्या नुकसानीचा या वेळी आढावा घेण्यात आला. आणि आपत्कालीन विभागाने २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व प्रभाग अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत विभागनिहाय महत्त्वाच्या सूचना केल्या. घाटकोपर येथे होर्डिंग्ज कोसळण्याची घडलेली दुर्घटना लक्षात घेत भिवंडी महापालिका क्षेत्रातील अंतर्गत भागात तसेच शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग, रेल्वे हद्द, एमआयडीसी भागात लावण्यात आलेल्या मोठे होर्डिंग स्वरुपातील आकाशचिन्ह जाहिरात फलकांचे रचनात्मक परीक्षण करण्याच्या यापूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करून घ्यावी, शा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एकूण होर्डिंग्सची संख्या, त्यांचे आकारमान, त्यामधील परवानगी दिलेल्या याची संख्या, याची माहिती त्वरीत संकलित करुन अहवाल सादर करावा, तसेच अनधिकृत पणे लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज यावर कारवाई करणे त्याचप्रमाणे अवैध, अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत आदेश देण्यात आले. जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वादळी वारे,अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीसमयी नागरिकांनी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला थांबू नये, असे आवाहन व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले.

होर्डिंग्ज प्रमाणेच ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेबाबतही सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. या वादळी कालावधीत अनेक ठिकाणी गच्चीवरील, घरांवरील पत्रे उडाले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सोसायटयांना व वसाहतींना देण्यात याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.भिवंडी क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई सुरु असून त्या कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिली. कालच्या अकाली पावसात बरेच ठिकाणी पाणी साठवण्याची कारणमीमांसा जाणून घेत आयुक्तांनी त्याठिकाणी योग्यती उपाययोजना करण्याचे निर्देशित संबंधिताना दिले.

सी-१ श्रेणीच्या अतिधोकादायक इमारतीमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्व खबरदारी घेण्याबरोबर पावसाळी कालावधीत साथरोग, मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे करण्याचे व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच याबाबत खाजगी डॉक्टर्सनाही सतर्क करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळाच्या कालावधीत पाणीपुरवठा शुध्द व पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घ्यावी तसेच उदयान विभागाने वाहतूकीला व रहदारीला अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांदया छाटण्याचे काम तत्परतेने पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. शहरात डेब्रिज आणून टाकले जाते अशा ठिकाणी विभाग अधिकारी यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. पावसाळा पूर्व सर्व कामे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.