नालेसफाईतील हात की सफाईवर आयुक्तांची नजर

चित्रीकरण आणि पर्यवेक्षणाचा निर्णय

ठाणे : दरवर्षी नालेसफाईतून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत विरोधक ठाणे महापालिकेला कोंडीत पकडत होते. आता मात्र २० एप्रिलपासून सुरुवात होणाऱ्या नालेसफाईवर चित्रीकरणाच्या माध्यमातून आयुक्त नजर ठेवणार आहेत. नाले सफाईकरिता १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यास जोडणारे लहान-मोठे नाले असे ३८४.९१ किमी नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी २९ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मागील वर्षी हा खर्च नऊ कोटी १५ लाख इतका करण्यात आला होता. यावर्षी उशिरा नाले सफाईच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत नालेसफाईच्या कामांचे कार्यादेश निघतील, त्यानंतर तत्काळ नालेसफाईला सुरुवात होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

नालेसफाईची कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करण्यात येतो. त्याद्वारे नाल्यातील गाळ काढला जातो. नाले सफाईच्या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामाच्या व्यतिरिक्त रस्त्याच्या आजूबाजूला असलेले कल्व्हर्ट सफाई केली जाणार आहे.

पालिका प्रशासनाने पावसाळापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नाल्याच्या शेवटच्या ठिकाणावर जो भराव साचलेला असतो, त्यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. परंतु आता शेवटच्या ठिकाणचा भराव काढला जाणार आहे. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते.

प्रभाग समिती – नाल्यांची संख्या
लोकमान्य-सावरकरनगर – ३४
उथळसर – ४
वर्तकनगर – २९
माजीवाडा- मानपाडा – ४४
मुंब्रा – ८०
कळवा – २०१
दिवा – १३१
नौपाडा- ४९
वागळे इस्टेट- ३८