अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी
ठाणे: ठाणे शहरात विविध उल्लेखनीय उपक्रम राबविणारे, पालिकेच्या कारभारात शिस्त आणणारे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची अखेर बदली झाली आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती.
नवी मुंबईत आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर अभिजीत बांगर यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये ठाणे महापालिकेत आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. जानेवारी २०२३ मध्ये पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे हा उपक्रम हाती घेतला. शहराच्या सौंदर्यीकरणासोबत स्वच्छतेवर त्यांनी भर दिला. शहरात एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्याचा सकारात्मक बदल ठाणेकरांना जाणवू लागला होता.
ठाण्यात त्यांनी वाचन संस्कृतीची चळवळ उभारली. पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ते आग्रही होते.
पहिल्यांदाच अर्थसंकल्पात ठाण्यातील प्रत्येक घटकाचा समावेश करण्यासाठी परिसंवाद घेतले. ठाणे पालिका आयुक्त पदाची त्यांनी जेव्हा सुत्रे हाती घेतली तेव्हा प्रशासक म्हणूनच त्यांनी कार्यभार स्विकारला. दर सोमवार हा नागरीकांच्या गाठीभेटीसाठी राखीव ठेवला. कार्यालयातील कर्मचार्यांना शिस्त शिकवली. सर्वात आधी मुख्यालयात हजर होणे आणि सर्वात उशीरापर्यंत काम करणारा आयुक्त अशी त्यांची ख्याती होती. अनेक कार्यक्रमांमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव वाढत असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनेकवेळा बदलीसाठी पत्रव्यवहार केल्याचे समजते.
नवीन आयुक्त कोण याची चर्चा
मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली होणार याची चर्चा होती. ती खरी ठरली. ठाण्यातून बांगर हे मुंबई महापालिकेत पी. वेलरासू यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून जाणार आहेत. याआधी आपल्या पदाचा कार्यभार पालिकेतील इतर अधिकार्यांना देण्याच्या सुचना त्यांना देण्यात आले आहेत. पण त्यांच्या जागी आयुक्त म्हणून शासनाने अद्यापी कुणाची नियुक्ती केली नसल्याने उत्सुकता वाढली आहे.