सदनिकेत बदल करुन व्यावसायिक वापर; एमआरटीपीचा गुन्हा दाखल

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील निवासी सदनिकेत अंतर्गत बदल करून व्यावसायिक आस्थापना सुरू करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक जागांचे भाव करोडोंमध्ये झाल्याने व्यावसायिकांनी निवासी सदनिका विकत घेऊन त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. मीरारोडच्या नयानगर परिसरातील फातिमा मंझिलच्या पहिल्या मजल्यावर इंदौर काॅटन या नावे कपड्यांचा व्यापार करणाऱ्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालय क्र. ५ मधील लिपीक दिनेश चापके यांनी कनिष्ठ अभियंता दर्शन पाटील यांच्या सोबत नयानगर येथील निहाल काॅर्नरसमोरील फातिमा मंझिल येथील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.१०१,१०२ ची पाहणी केली असता सदनिकेतील अंतर्गत बांधकाम बदल करुन त्यामध्ये इंदौर काॅटन या नावाने कपड्यांचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.

या जागेचा पंचनामा करून नयानगर पोलीस ठाण्यात लिपिक दिनेश चापके यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अस्लम दालखानिया विरोधात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.