आरामदायक सेवेचा संसर्ग; चालक होईनात ‘टीएमटी’त वर्ग!

* ७६ बसचालक अन्य विभागात रुळले
* परिवहन सेवेला भेडसावते चालकांची टंचाई

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील ७६ चालकांना कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि रुग्ण वाहिकेवर पाठवण्यात आले होते. मात्र आता परिवहन सेवेला गरज असताना हे कर्मचारी तेथील आरामदायक सेवा सोडण्यास तयार नसल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोना काळात परिवहन सेवा बंद असल्याने रुग्णवाहीका, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागात ७६ चालकांना तात्पुरत्या सेवेसाठी पाठविण्यात आले होते. कोरोना काळ संपून आता सुमारे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला आहे. तरी देखिल हे कर्मचारी पुन्हा त्यांच्या परिवहन सेवा या मूळ विभागात जाण्यास तयार नसल्याचे समजते.

अग्निशमन दलात असलेल्या या चालकांना अग्निशमन दलाची व्होल्व्हो बस देखील चालवता येत नसल्याचे समोर आले आहे. या चालकांचे वय देखिल ५० वर्षांपेक्षा जास्त झाल्याने एखादी आगीची दुर्घटना घडल्यास हे चालक वेळेवर घटनास्थळी पोहचतील का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

अग्निशमन दल, रुग्णवाहीका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात आरामदायक नोकरी आहे. एखादी घटना घडली तरच वाहन चालवावे लागत असल्याने या कर्मचाऱ्यांची मानसिकता परिवहन विभागात जाण्याची नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत परिवहन महा व्यवस्थापक श्री. बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि या कर्मचाऱ्यांना परत पाठवा अशी सहा पत्रे देऊन मागणी केली आहे, तरीही त्यांची सेवा वर्ग करण्यात आली नाही. हे कर्मचारी तेथे असल्यामुळे परिवहन सेवेत चालकांची कमतरता जाणवत आहे. खाजगी ठेकेदाराला चालकाचे मानधन द्यावे लागत असून परिवहन सेवेचे त्यामुळे नुकसान होत असल्याचे श्री. बेहरे म्हणाले.

याबाबत ठाणे महापालिकेचे मुख्यालय उपायुक्त जी.जी.गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि परिवहन आणि ठाणे महापालिका ही एकच संस्था आहे, त्यामुळे त्यांनी या विभागात काम करणे गैर नाही. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि रुग्ण वाहिकेवर चालकांची आवश्यकता असल्यामुळे त्यांना या विभागात ठेऊन घेतले असून परिवहन विभागाने मागणी केल्यास त्यांचे कर्मचारी त्यांना परत केले जातील. काही विभागांकरिता चालक भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.