ठाण्यात आ. केळकर यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी

ठाणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी आज, बुधवारी सायंकाळी उशीरा जाहीर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंंदे यांचे कडवे विरोधक वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. तर ठाणे शहरात निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यातबळी आहे.

विशेष म्हणजे, नवी मुंबईतील नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. राज्यासह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणूका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापैकी नगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. या निवडणुका तोंडावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी सांयकाळी केली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा सामावेश आहे.

नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवित असताना प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी काही निवडणूक प्रमुखही निश्चित केले आहेत. यामध्ये ठाणे शहरासाठी आमदार संजय केळकर, ठाणे ग्रामीणसाठी माजी खासदार कपिल पाटील, भिवंडीसाठी आमदार महेश चौघुले, मीरा-भाईंदरकरिता आमदार नरेंद्र मेहता, नवी मुंबईत माजी खासदार संजीव नाईक, कल्याणमध्ये नाना सुर्यंवशी, उल्हासनगरमध्ये प्रदीप रामचंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई-विरार आणि पालघर भागासाठी आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. तर रायगड उत्तर आणि रायगड दक्षिणची जबाबदारी अनुक्रमे रामशेठ ठाकूर आणि सतीश धारप यांना देण्यात आली आहे.