आत्महत्येच्या तयारीत असलेल्या मजुराचे पोलिसांकडून मनपरिवर्तन

ठाणे: गावी जाण्यासाठी ठेकेदार पैसे देत नसल्याने ३५ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्यापूर्वीच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने मजुरांचे मन वळवल्याने त्याचा जीव वाचला आहे.

सत्येंद्र गौड (२७) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मजुराचे नाव आहे. कोलशेत रोड मार्गांवर एका इमारतीचे काम सुरु असून हा मंजूर तेथे कामाला होता. त्याला गावी जायचे होते, परंतु मंजूर ठेकेदार त्याला त्याचा पगार देत नव्हता. अनेकदा विनंती करून देखिल त्याला गावी जाण्यासाठी पैसे मिळत नसल्याने संध्याकाळी ४.२०च्या दरम्यान इमारतीच्या ३५व्या मजल्यावरून तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता.

याबाबतची माहिती कापुरबावडी पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी त्याला त्याचा पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले, परंतु सुमारे तीन तास तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी त्याचे वेतन काही क्षणात देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा इरादा सोडून इमारतीच्या खाली आला. पोलिसांनी त्याला पैसे मिळवून दिल्याने त्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात नोद घेण्यात आली आहे.