कर्मचाऱ्यांना सुट्टी नाहीच; शीळमध्ये पाच इमारती रिक्त

ठाणे: अनधिकृत इमारतींच्या तोडकामादरम्यान जेवण, चहा-नाश्ताच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून होणारी टंगळमंगळ रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणीच जेवण आणि नाश्त्याची सोय केल्याने कामाची गती वाढल्याचा अनुभव दिव्यातील मोहिमेत आला. आज अतिक्रमणविरोधी पथकाने सात इमारती रिकाम्या केल्या.

ठाणे पालिका हद्दीतील शीळ फाटा भागातील अनधिकृत इमारतींच्या विरोधात उच्च न्यायालयात दोन दाखल याचिकांवर सुनावणी देताना न्यायालयाने ही बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सोमवारपासून अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाई सुरु झाली आहे. त्यानुसार शिळ परिसरातील आणखी ११ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने ११ पैकी तीन इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. उर्वरित इमारतीत नागरिक राहत होते. त्यांनी कारवाईस विरोध केला होता. पावसाळा आणि सण उत्सवांमुळे पालिकेने ही कारवाई थांबविली होती. मात्र, दिवाळी संपताच पालिकेने सोमवारपासून उर्वरित आठ इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, कारवाईवेळी पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. काल सकाळपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती. परंतु महापालिका प्रशासनाने काल कर्मचाऱ्यांना जेवण, चहा, नाश्ता त्याच ठिकाणी दिला गेला, म्हणून दुपारी कामाला सुरुवात झाली होती.

दरम्यान, नागरिकांची समजूत काढत पालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. इमारतींवर कारवाई दरम्यान, चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणासाठी कर्मचारी वर्ग इतरत्र जात असल्यामुळे त्याचा परिणाम कारवाईवर होवून एक दिवसाची कारवाई दोन दिवसांवर जाते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कारवाईच्या ठिकाणीच चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली होती, यामुळे सोमवारी दुपारनंतर कारवाई अखंड सुरू राहिल्याने दोन इमारती रिकाम्या करणे पालिकेला शक्य झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. काल जो प्रयोग केला त्याचा परिणाम दिसून आला असून आज संध्याकाळपर्यंत पाच इमारतींमधील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले आहे. उद्या या रिकाम्या झालेल्या इमारतींच्या विरोधात कारवाई करून या सर्व इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त श्री. रोडे यांनी व्यक्त केला.