ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी राजन साळवी यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (एसीबी) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी कार्यालयाबाहेर राजन साळवी देखील उपस्थित होते.
आमदार साळवी यांनी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत रत्नागिरीमध्ये वेगवेगळया ठिकाणी तीन कोटी ५३ लाख ८९ हजार ७५२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. त्याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण त्यांनी सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांना मालमत्ता संदर्भातील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते असे एसीबीच्या वतीने सांगण्यात आले. सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.